25/09/2020
शेअर बाजार वार्ता २५ सप्टेंबर २०२०
नमस्कार मंडळी
सप्टेंबर महिन्यात आपली भेट तिसऱ्यांदा होत आहे , अहो कारणच आहे तसे , प्रथम पहिल्या आठवड्यात बाजार तेजीत असताना आणि सेबीचे नवीन मार्जिन नियम लागू झाल्यावर त्याचा परिणाम ह्यावर सदर लिहले होते आणि हा महिना ट्रेडर ने जरा सांभाळून असा इशारा दिला होता , त्यानंतर १२ सप्टेंबर ला सेबी च्या मल्टी कॅप फंडाच्या नियमावली बद्दल लिहले होते आणि तेव्हादेखील थेट गुंतवणूक ( अभ्यासपूर्ण ) कशी फायद्याची असते ह्यावर लिहले होते आणि आता गेल्या ६ दिवसातील घसरण पाहिल्यावर पुन्हा घेऊन आलोय शेअर बाजार वार्ता
मंडळी आपण पाहीले असेल कि अगदी पहिल्या लेखात मी कल्पना दिली होती कि सप्टेंबर महिना हा बाजारासाठी नेहमी तितका चांगला नसतो आणि अशा वेळी बाजार खाली जाण्याची शक्यता असते , तसाही अल्पावधीत तो खूप वर आल्यावर तो थांबणे किंवा खाली जाणे हे अपेक्षित होतेच , अर्थात TV वर लोक निर्देशांक आता ऑल टाइम हाय क्रॉस करणार वैगैरे अशा वल्गना करताना आपण अनेकांना पाहीले आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो कि TV चॅनेल पाहून कोणाला शेअर बाजारात पैसे मिळत नाहीत ,फुकटचा सल्ला इतरत्र कदाचित उपयोगी पडत असेल पण शेअर बाजारात नक्कीच नाही , असो ... अशा लोकांसाठी २ मिनिटाचे मौन
काल तर जय महाराष्ट्र चॅनेल वर माझा दुपारी फोन कॉल पण झाला , तेव्हा देखील मी हेच सांगितले कि बाजार अल्पावधीत तेजीत आला होता त्यामुळे त्याला थांबणे गरजेचे होते आणि चीन सीमेवरील तणाव , पाक सीमेवरील तणाव , अमेरिका चीन ट्रेंड वॉर , कोरोना चे वाढणारे रुग्ण , अजून न मिळालेली लस , घसरणार जीडीपी , विस्कटलेली आर्थिक घडी , बँकिंग क्षेत्रामध्ये मध्ये येत असेलेल्या नवीन नवीन बातम्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत कि ज्या मूळे बाजार खाली आला आणि त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य गुंतवणूकदार हवालदिल झाला, अहो तसा तर तो कायमच असतो थेट गुंतवणूक केली तरी किंवा फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली तरी अहो साधा नियम जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा NAV पण कोसळते पण जेव्हा बाजार तेजीत येतो ( जसा मागील ३ महिन्यात आला होता ) तेव्हा NAV त्याच गतीने नाही वाढत ह्याची कारणे ज्याची त्याने शोधायची आहेत
असो पुढे काय ???
शेअर बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेडिंग करणाऱ्या माणसांपेक्षा काठावरून मजा बघणाऱ्या लोकांना हा प्रश्न जास्त पडतो , जे बाजारात ट्रेडिंग करतात किंवा गुंतवणूक करतात त्यांना माहित असते कि आज खाली गेलेला बाजार उद्या वर जाणार असतो ( जसा आपण गेल्या ६ महिन्यात पहिलेच कि ) हे वारंवार सिद्ध झालेले आहे त्यामुळे पुढे काय हा प्रश्न खरं तर पडायला नकोच पण तरी ... येणारा काळ अधिक सावधानता बाळगायला हवी , शेअर बाजार वर खाली होणे हा त्याचा स्थायी भाव आहे हे प्रथम जाणून घ्या , आता थोडक्यात सांगायचे तर गेल्या ६० दिवसात पाहायला मिळालेली तेजी फक्त ६ दिवसात गायब झाली आणि पुन्हा बाजार त्याच ठिकाणी आलाय जिथे ६० दिवसांपूर्वी होता , सो सोनार कि तो एक लोहार कि हि म्हण बाजारात मंदी करणाऱ्या ट्रेडर्स साठी लागू पडते ते काही उगाच नाही ( हे देखील वारंवार सिद्ध झालेले आहे )
दिवाळी पर्यंत बाजार असाच अस्थिर राहण्याची शक्यता वाटत आहे , अर्थात तो अजून किती खाली जाईल किंवा पुन्हा किती वर जाईल हे येणार काळ ठरवेल , आपण मात्र चांगले समभाग निवडून आपले आपले इच्छित मनोरथ पूर्ण करून घ्यावे इतकेच मी म्हणेन , आता गेले ३-४ महिने तेजी पाहिल्यावर अनेकांना लेफ्ट आऊट फील आला असण्याची शक्यता आहे कि त्यांना ह्या तेजीचा काही फायदा घेता आला नाही त्यांना बाजाराने पुन्हा संधी दिली आहे आजपासून आपण बाजारात उतरू शकता आणि ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करू शकता पण ह्या साठी थोडा अभ्यास असणे आवश्यक आहे , कोरोना कधी जाईल हे आता कोणीच सांगू शकत नाही आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा काही देशात नव्याने लागू झालेले लॉक डाऊन , वाढती रुग्णांची संख्या आणि ह्या सर्वांचा व्यापारावर आणि त्या त्या देशाच्या अर्थकारणावर होणार परिणाम हा येणाऱ्या काळात पाहायला मिळेल सुदैवाने भारतात अजून तशी गंभीर परिस्थिती नाही पण शेवटी ज्याची काळजी त्याने घ्यायची हा नियम
अनके जणांनी विचारले होते पुढील कार्यशाळा कधी आहे कारण सप्टेंबर महिन्यात डेअर टू शेअर ची एकही कार्यशाळा घेतली नाही ( आधी तसे सांगितले होतेच ) पण आता ऑक्टोबर पासून पुन्हा सुरवात करतोय , उद्या त्याच्या तारखा सांगेन पहिल्या आठवड्यापासून कार्यशाळा सुरु होईल तेव्हा त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा , निदान शेअर बाजार समजून घ्यावा मग शेअर बाजारात प्रवेश करायचा कि नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे , मी तरी गेली १५ वर्षे ह्या बाजारात आहे आणि एन्जॉय करीत आहे अर्थात माझी विचारसरणी दीर्घकालीन असली तरी मी थेट गुंतवणुकीला किंवा ट्रेडिंग ला प्राधान्य देतो कारण त्याचे फायदे अनन्यसाधारण आहेत आणि हो हे प्रत्येकाला जमू शकते फक्त हवी सकारात्मक मानसिकता आणि थोडासा वेळ तेव्हा लवकरच प्रत्यक्ष भेटूया कार्यशाळेत
डिस्क्लेमर : वरील लेखातून मी माझी वैयक्तिक मत मांडली आहेत आपण माझ्या मताशी सहमत असावे असे अजिबात नाही , आपले मत वेगळे असू शकते , मी मला आलेल्या वैयक्तिक अनुभवातून लिखाण करीत असतो ,ह्यातून गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीविषयी अधिक सजग करण्याचा माझा मानस असतो , माझ्या लेखातून मी कधीच कुठलाही समभाग किंवा निर्देशांकाच्या खरेदी विक्री चे सल्ले देत नाही , कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या वित्तीय सल्लागारांचे मत घ्यावे हि नम्र विनंती
सीए निखिलेश सोमण
शेअर बाजार अभ्यासक
९५९४०८३७६९
८८५०२७२७६५