24/03/2026
पत्नी घरकाम करायला नकार देते, हा 'मानसिक छळ' असल्याचे कारण देत दाखल झालेल्या एका घटस्फोटाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्वागतार्ह निकाल देताना म्हटले- "तुम्ही एखाद्या मोलकरणीशी लग्न केलेले नाही, तर तुमच्या जोडीदाराशी लग्न केले आहे. त्यामुळे घरकामात आणि स्वयंपाकात पत्नीला मदत करणे हे पतीचेही कर्तव्य आहे."
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आपल्या समाजात पिढ्यानुपिढ्या रुजलेल्या ‘बाहेरचं काम पुरुषांचं आणि घरातलं काम स्त्रियांचं’ या समीकरणावर बोट ठेवलं आहे. या निर्णयाने या प्रश्नाला वाचा फोडली आहे, की जर घर हे दोघांचे असते, तर घरकामाची जबाबदारी फक्त बाईचीच का मानली जाते? स्वयंपाक करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, घर साफ करणे, मुलांची काळजी घेणे—ही सर्व कामे आपोआप बाईच्या वाट्याला का येतात? ही कामे “बाईचीच” आहेत असे आपण का गृहीत धरतो?
लहानपणापासूनच मुलींना घरकाम शिकवले जाते. “उद्या सासरी जाऊन उपयोगी पडेल” असे सांगितले जाते. पण मुलांना मात्र अशा प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. उलट, घरकाम करणारा मुलगा मस्करीचे कारण बनतो.
पुरुष बाहेर जाऊन पैसे कमावतो म्हणून त्याला घरकामातून सूट दिली जाते. पण आज अनेक स्त्रिया देखील बाहेर काम करतात, पैसे कमावतात. तरीही घरकामाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असते. म्हणजेच स्त्रियांना दुहेरी काम करावे लागते.
घरकामाला “काम” म्हणून मान्यता दिली जात नाही. त्यासाठी कोणताही पगार मिळत नाही, सुट्टी मिळत नाही, आणि त्याचे कौतुकही होत नाही. पण हे काम थांबले तर घर चालेल का? घर हे दोघांचे आहे, तर घरकामही दोघांनी मिळून करायला नको का?
पुरुषांनी घरकामात सहभागी होणे ही कमीपणााची गोष्ट नाही. उलट, ती समानतेची आणि जबाबदारीची जाणीव आहे.
मुलगा आणि मुलगी दोघांनाही घरकाम शिकवले पाहिजे. घरकाम ही केवळ स्त्रीची जबाबदारी नसून ती सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, हे नवे समीकरण आता आपल्याला रुजवायला हवे.
ोघांचे_घरकाम_दोघांचे ोघांच_असतं_दोघानीं_सावरायचं_असतं #बाईपणभारीदेवा #मैत्रीणी