Krushishri-कृषिश्री

Krushishri-कृषिश्री India is an Agrarian country. Furthermore, India's farmable land area of 159.7 million hectors which is the second largest in the world following USA.

According to survey conducted in 2013, India ranks world-wide second for earning from agriculture and allied sector. It has a share of 13.7% of the total GDP. Inspite of this, the Indian farmers recieve only 10-23% of the consumers pay. And hence the the rate of farming occupation is decreasing day by day in India. Also the World Bank had suggested that if India wants to become strong in every asp

ect, they need to focus more on the farming sector as most of its output comes from farming. And we believe that our firm Krushishri Agro will help farmers. Jai Jawan Jai Kisan.

19/11/2017

एका झोपडीतून सुरु झालेला 'अंबिका मसाला'
उद्योगाचा प्रवास आता परदेशात जाऊन पोहोचलाय

आम्ही आमचं मार्केटिंग चांगलं केलं. मिळालेल्या संधीचा फायदा उचलला.

कमलताई शंकर परदेशी यांना पाहिलं की त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सर्वसाधारण गावातल्या सर्वसाधारण महिलेची आठवण होते. डोक्यावर पदर, कपाळावर हे भला मोठा कुंकवाचा टिळा, सतत हसरा चेहरा. पण जेव्हा कमलताई बोलायला लागतात तेव्हा मात्र समोरचा मंत्रमुग्ध होतो. एखाद्या मॅनेजमेन्ट प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला मागे टाकून कमलताई व्यवहाराचं गणित अगदी पक्क मांडतात. त्यांच्या या मॅनेजमेन्ट कौशल्यावर आज दौंडच्या अंबिका महिला बचत गटानं अगदी काही हजारोंपासून सुरु केलेला मसाल्याचा कारखाना आता कोटींची उलाढाल करायला सज्ज झालाय.

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात खुटबाव इथं कमलताई शेतमजूरी करायच्या. पण ही शेतमजूरी आपल्या आयुष्याचं धेय्य असू शकत नाही हे त्यांचं पक्क होतं. कमलताई म्हणतात, "दादा आम्ही अंगठेबाज, शिक्षण नाही त्यामुळं पुढे कसं जायचं याचं ज्ञान नव्हतं. पण फक्त शिक्षणानंच कागदी ज्ञान मिळतं, पण जीवनाची शाळा अजीब आहे. तिथं व्यवहारात पक्क असावं लागतं. माझं व्यवहारज्ञानच पक्क केलं होतं मी लहानपणापासून. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करुन आपल्याला काहीही मिळणार नाही हे मला माहित होतं. माझ्यासारख्या इतर बायकाही होत्या. जर मन पक्क केलं नसतं तर अजूनही शेतात राबत राहिले असते. जर बोलले नसते तर अजूनही मानखाली घालून कंबर तुटेपर्यंत काम करावं लागलं असतं.”

आपल्या सारख्या १० निरक्षर महिलांना एकत्र करुन त्यांनी अंबिका महिला बचत गटाची स्थापना केली. त्यांची नोंदणी झाली. प्रत्येक महिलेनं महिन्याला १०० रुपये जमा करायचे असं ठरलं. खुरपणी आणि शेतमजूरी करुन या महिलांनी फक्त तीन महिन्यात साडेतीन हजार रुपयांचे भांडवल जमवलं. यातून मसाला उद्योग सुरु करायचा पक्क झालं. मग त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या धने आणि इतर साहित्य आणलं. मसाला करण्याचं प्रशिक्षण खादी व ग्रामोद्योग विभागाकडून देण्यात येतं. पण इथं शिक्षणाची अट नववी ते दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी होती. या नियमात बसत नसल्यानं कमलताईंनी शक्कल लढवली. त्यांनी आधीच हे प्रशिक्षण घेतलेल्या महिलेला आपली गुरु बनवली. तिच्याकडून सर्व गोष्टी शिकून घेतल्या आणि आपल्या इतर सहकाऱ्यांना शिकवल्या. आणि झोपडीवजा घरात त्यांनी आपला हा मसाल्याचा कारखाना सुरु केला.

मसाला तयार तर झाला पण तो विकणं हे जास्त कठीण काम होतं. कुठलीही गोष्ट विकण्याचा अनुभव या दहा जणींपैकी कुणालाही नव्हता. त्यामुळे आपला हा मसाला नक्की कुणाला विकायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शिवाय विकण्याची कला शिकायची होती जसजशा ओळखी वाढत जातील तसतसा उद्योग वाढला पाहिजे असं कमलताईंना वाटत होतं. त्यांनी खुटबाव, भरतगाव आणि यवत आदी भागातल्या आठ बचत गटातल्या महिलांना एकत्रित आणलं. आता १०८ महिला एकत्रित आल्या. आवाका वाढला. त्यामुळे या सर्व बचत गटांची मिळून अंबिका औद्योगिक सहकारी संस्था निर्माण करण्यात आली. यातून व्यवसाय वाढवायचा होता. त्यासाठी राष्ट्रीय बँकेतून कर्ज घेण्यात आलं. आता अंबिका मसाल्याची व्याप्ती वाढत होती. हळूहळू पुणे शहरापर्यंत पोचलेली ही व्याप्ती मुंबईपर्यंत वाढवण्याची संधी महालक्ष्मी सरस या बचत गटाच्या प्रदर्शनातून मिळाली. मुंबईचं मार्केट काबीज करायचं असं ठरलं आणि कमलताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट दादरच्या गर्दीत उभं राहून मसाला विकला. चांगला प्रतिसाद मिळाला. लोक पुन्हा पुन्हा येऊ लागले. मुंबईच्या बाजारात आपल्या मसाल्याला मागणी आहे. असं लक्षात येताच दर १५ दिवसांनी १५-२० किलो मसाला मुंबईच्या बाजारात आणण्याचं ठरलं. पॅकिंग चांगली झाल्यानं आता फोनवरुनही ऑर्डर येऊ लागल्या. त्यांना कुरीयरनं घरपोच डिलीवरीही देण्यात आली.

हे असं घडत असताना अंबिका मसाला बिग बाजारात पोचला. खासदार सुप्रिया सुळे यांनी बचत गटांचा हा मसाला बिग बाजारातल्या लोकांना चवीसाठी दिला होता. मसाला उत्तमच होता. त्यामुळे थेट अडीच लाखांची ऑर्डर अंबिका मसाल्याला मिळाली. आता दर आठवड्याला ही ऑर्डर मिळते. महिन्याला तीन ते साडे तीन लाखांचा माल मुंबईतल्या अनेक मॉलमध्ये जातो. ही फक्त मुंबईतली मागणी आहे. राज्याच्या इतर शहरांमध्येही अंबिका मसाल्याला चांगली मागणी आलीय.

आता या अंबिका औद्योगिक सहकारी संस्थेनं कोटीची उड्डाणं केली आहेत. एका झोपडीतून सुरु झालेला हा प्रवास आता परदेशात जाऊन पोचतोय.

18/11/2017

तयार करा दर्जेदार बेदाणा

चांगल्या प्रतीचा बेदाणा हा बागेमध्येच तयार होतो. फळकाढणी झाल्यानंतर जी काही प्रक्रिया आपण करतो त्यावरसुद्धा चांगली प्रत अवलंबून असते.

ऑक्‍टोबर महिन्यात फळछाटणीचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर फळछाटणी झाली, की बागेत द्राक्षघडांच्या संगोपनाकरिता व्यवस्थापन केले जाते. दर्जेदार बेदाण्यासाठी सुरवातीपासूनच द्राक्षबागेचे संगोपन महत्त्वाचे असते.

बेदाणा सुकवण्याची पद्धत
1) आपल्या देशात तसेच परदेशात द्राक्ष सुकवण्याची पद्धत जरी सारखीच असली तरी पण संबंधित विभागावरदेखील बेदाणा प्रत जास्त अवलंबून असते. उन्हामध्ये द्राक्ष सुकवणे, सावलीमध्ये द्राक्ष सुकवणे किंवा यंत्राच्या माध्यमातून सुकवलेल्या द्राक्षांचे शेवटी बेदाण्यात रूपांतर होते; परंतु चांगली प्रत म्हणजे बेदाणा तयार करण्यापूर्वी द्राक्षाचे व्यवस्थापन कसे केले, यावरसुद्धा तितकेच अवलंबून असते.
2) राज्यात सावलीमध्ये द्राक्ष सुकवून बेदाणा तयार करण्याची पद्धत आहे. बेदाणा तयार करण्यास मुख्यत्वे वातावरणात जास्त तापमान (40 ते 45 अंश सेल्सिअस) व आर्द्रता (20 ते 30 टक्के) असल्यास बेदाणा लवकर आणि चांगल्या प्रतीचा तयार होण्यास मदत होते.
3) द्राक्षामध्ये सुरवातीस असलेले सर्व घटक जसेच्या तसे बेदाण्यामध्ये असणे म्हणजेच बेदाण्याची मिळालेली चांगली प्रत होय.

बेदाणा तयार करणे
द्राक्षघड डिपिंग ऑइलमध्ये बुडवणे
1) द्राक्षबागेतून फळकाढणी झाल्यानंतर उत्कृष्ट बेदाणा तयार करण्याकरिता सुरवातीपासूनच योग्य नियोजनाची गरज असते. फळकाढणीनंतर क्रेटमध्ये गोळा केलेली द्राक्षे आधी स्वच्छ पाण्यात बुडवून घ्यावीत. यामुळे घड तसेच मण्यांवर असलेली धूळ निघून जाईल.
2) यानंतर बेदाणा तयार करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या डिपिंग ऑइलचे द्रावण तयार करावे. इथाईल ओलिएट हे रसायन याकरिता वापरण्यात येते. इथाईल ओलिएट 15 मि.लि. अधिक पोटॅशियम कार्बोनेट 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणाचा सामू 10 पेक्षा जास्त असावा.
3) स्वच्छ पाण्यातून ही द्राक्षे काढल्यानंतर तयार केलेल्या अल्कली धर्मीय द्रावणात सुमारे पाच मिनिटे बुडवून ठेवावीत. यामुळे प्रत्येक मण्यात याचे शोषण होईल. मण्यातून पाणी लवकर निघून जाईल आणि बेदाणा तयार होण्यास मदत होईल.
4) यानंतर ही द्राक्षे बेदाणा शेडवर (रॅक) व्यवस्थितरीत्या एकाच थरात पसरवून घ्यावीत. वरील द्रावणाची फवारणी पुन्हा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी एकदा केल्यास साधारणतः 15 दिवसांत बेदाणा तयार होण्यास मदत होते.
5) मणी सुकताना वातावरणातील तापमान, आर्द्रता व सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे वाहते वारे गरजेचे असते. बेदाणा सुकवण्याच्या परिसरात जर वारा वाहत असेल तरच द्राक्षमणी लवकर सुकण्यास मदत होईल. अन्यतः बेदाणा काळा पडू शकतो 6) मण्यामध्ये जास्त काळ पाणी राहिल्यास त्यावर बुरशी तयार होण्याची संभावना असते.
7) मणी चांगल्या प्रकारे सुकण्यासाठीचे वातावरण जुनोनी (जि. सांगली) येथे आहे म्हणूनच या भागास "रेझिन हब' असेसुद्धा म्हणतात.

सुकलेला बेदाणा निवडणे
1) ज्या वेळी बेदाणा शेडमध्ये द्राक्षमणी पसरले जातात, तेव्हा इतर कुठल्याही गोष्टींचा विचार केला जात नाही. मात्र बेदाणा सुकल्यानंतर निर्यातक्षम असा चांगला बेदाणा पॅकिंग करण्यापूर्वी त्यामधील घडांचे देठ, लहान आकाराचे मणी, फुटलेला किंवा चिरलेला मणी, काळे पडलेले मणी निवडणे गरजेचे असते.
2) बेदाणा तयार होत असताना काही प्रमाणात धूळ बसलेली असते. ही धूळ किंवा बेदाण्यावर असलेले मातीचे कण पाण्याच्या फवारणीमुळे किंवा पुन्हा मणी पाण्यातून काढून सुकवले जातात.

सुकलेल्या बेदाण्याची प्रत
1) द्राक्षघड सुकवल्यानंतर तयार झालेल्या बेदाण्याची प्रत ओळखण्याकरिता काही मानके आहेत. यामध्ये प्रामुख्याने तजेलदार किंवा चकाकीपणा, हातात घेतल्यानंतर बोटांना न चिकटणारा, स्वच्छ, कुठल्याही प्रकारची इजा झाली नसलेला बेदाणा चांगल्या गुणवत्तेचा असतो.
2) बेदाणानिर्मितीकरिता वापरण्यास आलेल्या प्रत्येक द्राक्षमण्यापासून बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया जरी एकच असली तरी तयार झालेल्या बेदाण्याची प्रत मात्र वेगळी असते. याकरिता द्राक्षघडाची परिपक्वता महत्त्वाची असते.
3) प्रत्येक द्राक्ष जातीमध्ये परिपक्वतेचा कालावधी वेगवेगळा आहे, त्यामुळे मण्यामध्ये गोडी येणे, त्यामध्ये रस आणि चोथा यांचे गुणोत्तरसुद्धा कमी - अधिक पाहावयास मिळते.
4) द्राक्षघडांवर परिपक्वतेच्या कालावधीमध्ये मिळालेला सूर्यप्रकाश हा मण्याचा रंग ठरवतो. त्याचप्रमाणे मण्यातील गोडीसुद्धा तितकीच अवलंबून असते. जर द्राक्षघड जास्त प्रखर सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आला असल्यास मण्यातील असलेले सर्व प्रकारची जीवनसत्त्वे व प्रथिने यांचा ऱ्हास होण्याची जास्त संभावना असते. त्याचसोबत मण्यामध्ये असलेले महत्त्वाचे फिनॉलिक्‍ससुद्धा तितक्‍याच प्रमाणात टिकवून राहणे चांगल्या प्रतीच्या बेदाण्याकरिता महत्त्वाचे आहे.
4) यानंतरच्या प्रक्रियेत बेदाणा तयार करताना सल्फर डाय ऑक्‍साईड आणि तत्सम गुणधर्म असलेल्या कंपाउंडचा वापर केला जातो. हे अँटीऑक्‍सिडेंट म्हणून कार्य करते. त्याचसोबत बेदाण्याला पिवळेपणा येण्यापासून थांबवते. थोडक्‍यात म्हणजे बेदाण्याची सुरवातीची प्रत तशीच टिकवून ठेवते. ही प्रक्रिया सल्फर डाय ऑक्‍साईडच्या धुरळणीद्वारे केली जाते.

बेदाणा साठवणूक
1) बेदाण्याचा हवेशी संबंध आल्यास त्यामध्ये लवकरच पाणी जाते. त्यानंतर बेदाणा फुगणे, त्यामध्ये सूक्ष्मजिवांचा प्रसार होणे, इ. गोष्टी दिसून येतात.
2) बेदाण्याची साठवणूक ही कमी तापमानात करण्याची शिफारस आहे. प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये पॅकिंग केलेला बेदाणा 400 गेज एलडीपीईच्या बॅगमध्ये ठेवून ते पाऊच कोरुगेटेड बॉक्‍समध्ये ठेवले जातात. बेदाण्याची साठवणूक अंधारात केल्यास साठवणूक क्षमता जास्त वाढून त्यामधील घटक तसेच राहत असल्याचे दिसून आले आहे.

असा असतो चांगल्या प्रतीचा बेदाणा
1) एकसारख्या रंगाचा (हिरवा, पिवळा, इ.) बेदाणा.
2) बेदाण्याचा प्रत्येक मणी एकसारखा आकाराचा.
3) बेदाण्यातील गोडी ही 22 अंश ब्रिक्‍सच्या वर असावी.
4) बेदाण्यातील पाणी हे 15 टक्केपेक्षा जास्त नसावे.
5) बेदाण्याची चव चांगली असावी.

⚜ *शेतजमीनीची मोजणी* ⚜कोणत्याही खातेदाराने मोजणीबाबतचा अर्ज दाखल केल्यानंतर अशा मोजणी प्रकरणाला मोजणी रजिस्टर क्रमांक दि...
17/09/2017

⚜ *शेतजमीनीची मोजणी* ⚜

कोणत्याही खातेदाराने मोजणीबाबतचा अर्ज दाखल केल्यानंतर अशा मोजणी प्रकरणाला मोजणी रजिस्टर क्रमांक दिला जातो. त्यानंतर या प्रकरणामध्ये या जमीनीबद्दलचे जे मूळ रेकॉर्ड कार्यालयात आहे त्या मूळ रेकॉर्डमधून टिपण / फाळणी व एकत्रीकरण झाले असल्यास त्या योजनेचा उतारा तयार करुन या प्रकरणामध्ये लावला जातो व हे संपूर्ण प्रकरण मोजणी करणार्‍या भूकर मापकाकडे (सर्व्हेअर) दिले जाते. मोजणीसाठी प्राप्त झालेल्या अशा प्रकरणामध्ये संबंधित भूकर मापक हा अर्ज करणार्‍या व्यक्तिंना व पत्ते देण्यांत आलेल्या लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या अगोदर किमान 15 दिवस रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून तारीख कळवतो. सर्वसाधारणपणे जून ते ऑक्टोबर या पावसाठी मोसमात तालुक्यामध्ये रेकॉर्डबद्दलचे काम केले जाते. उर्वरित काळात जमीनीच्या मोजणीचे काम सर्व्हेअरमार्फत केले जाते. प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी, मोजणी करण्यासाठी भूकर मापकास मदतीसाठी लागणारे मजूर, निशाणदार, चुना, हद्दीचे दगड इत्यादी साहित्य हे अर्जदाराने स्वत:च्या खर्चाने पुरविणे अपेक्षित आहे.

आजकालच्या सर्व मोजणी या प्लेन टेबल मोजणी पध्दतीने केल्या जातात. प्रत्यक्ष जमीनीची लांबी, रुंदी किंवा बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पध्दतीने मोजणीदाराला मोजणी नकाशा हा तंतोतंत वस्तुस्थितीप्रमाणे तयार करता येतो. जमीन वर, खाली, ओबडधोबड व ओढया-नाल्याची असली तरी तिचे निश्चित असे आकारमान हे या प्लेन टेबल पध्दतीने समजू शकते.

मोजणीसाठी आलेले सर्व्हेअर हे सर्वप्रथम जी जमीन मोजावयाची आहे त्या जमीनीची पाहणी करुन प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याबाबत अर्जदार शेतकर्‍यास विचारणा करतात. प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे जमीनीमध्ये किंवा त्या गटाजवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड किंवा उरळया याच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या आधारे जमीनीची मोजणी केली जाते. मोजणीच्या वेळी अनेकवेळा जो शेतकरी अर्ज करतो त्याच्या लगतचे शेतकरी मात्र गैरहजर राहतात. विशेषत: जर अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर अतिक्रमण करणारी व्यक्ती हजर रहात नाही. एखादी व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर राहिले तरी त्यांच्या गैरहजेरीमध्ये मोजणी करता येते. तथापि मोजणी करण्यांत येणार आहे अशाप्रकारची आगाऊ नोटीस संबंधीत व्यक्तिला बजावली गेली असली पाहिजे किंवा त्या व्यक्तिनी ही नाटीस घ्यावयास नकार दिला असला पाहिजे. मोजणीच्या आधारे प्लेन टेबल वर आपोआप जमीनीच्या खूणा व नकाशा तयार होत जातो. मोजणीच्या संदर्भात अर्जदारासह सर्व संबंधिंतांचा लेखी जबाबसुध्दा सर्व्हेअरकडून घेतला जातो. एखाद्या व्यक्तीने जबाब न दिल्यास, त्याने जबाब द्यावयास नकार दिला असा पंचनामा करतात. प्लेन टेबलच्या आधारे होणारी ही मोजणी नेहमीच जमीनीच्या मूळ रेकॉर्डशी तुलना करुन पाहिली जाते. त्यामुळे कधीकधी जमीनीची मोजणी झाली की लगेचच हद्दीच्या खुणा न दाखवता पुन्हा तालुक्यामध्ये जाऊन मूळ रेकॉर्डशी तुलना करुन क्षेत्राचा मेळ बसल्यानंतर काही दिवसांनंतर जमीनीच्या हद्दी दाखविल्या जातात.

मोजणीच्या हद्दी दाखविल्यानंतर अर्जदाराने हद्दीच्या निशाणी (दगड) त्या हद्दीच्या खुणांप्रमाणे बसवून घेणे अपेक्षित आहे.

*मोजणीनंतरची कार्यवाही -*
अशा पध्दतीने जमीनीची मोजणी करुन प्रत्यक्ष हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर तालुका कार्यालयात मोजणी नकाशाच्या स्वच्छ दोन प्रती तयार केल्या जातात. अशा मोजणी नकाशामध्ये मोजणी कोणी मागितली आहे त्या अर्जदाराचे नांव, मोजणीची तारीख, सर्व्हेअरचे नांव, नकाशाच्या दिशा, हद्दी दाखविल्याचा दिनांक, नकाशाचे स्केल व सहीशिक्का इत्यादी महत्वाचा तपशिल लिहिलेला असतो. जर वहिवाटीची हद्द आणि रेषेप्रमाणे येणारी हद्द वेगवेगळया असतील तर अशी वहिवाटीची हद्द तुटकतुटक रेषेने व रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सलग रेषेने दाखविली जाते. या दोन्हीमध्ये अतिक्रमणाचे क्षेत्र रंगाने रंगवून दाखविले जाते. मोजणी नकाशावर सुध्दा - - - ही वहिवाटीची हद्द असून __ ही रेकॉर्डची हद्द आहे व क रंगाने दाखविलेले क्षेत्र हे - गट नं. मधील असून त्यामध्ये - गट नंबराच्या मालकाने अतिक्रमण केले आहे असा उल्लेख असतो. अशा पध्दतीने मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज निकाली काढून त्यास मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते.

*निमताना मोजणी अर्ज -*
वरील पध्दतीने जमीनीची एकदा मोजणी झाली आणि सर्व्हेअरने हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर जर अशी मोजणी जर मान्य नसेल तर मूळ मोजणीच्या विरोधात अपील करण्याची तरतूद आहे. त्यानुसार थेट तालुका निरिक्षक भूमि अभिलेख यांचेकडे निमताना मोजणीसाठी अर्ज केला जातो. अशा अर्जावरुन स्वत: तालुका निरिक्षक हे, पुन्हा केलेल्या मोजणीची परत खात्री करुन स्वतंत्र मोजणी करुन जमीनीची हद्द दाखवतात

31/08/2017

⚱ *साठवणीतील धान्यावरील किडींना करा प्रतिबंध* ⚱

हंगाम संपल्यानंतर धान्य साठवणीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते.

_*चंद्रकांत सावंत, सचिन मुंढे*_

राज्यामध्ये विविध हंगामांत कडधान्य, तृणधान्ये व गळीतधान्य पिके घेतली जातात. आपण चांगले उत्पादन घेत असलो तरी काढणीपश्चात तंत्रज्ञानाकडे आपले दुर्लक्ष असते. नवीन धान्याची एकाच वेळी आवक झाल्याने दर कमी होतात. हे टाळण्यासाठी धान्य तीन ते चार महिने साठवण करून, अपेक्षित बाजारभाव असताना बाजारात आणल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
धान्य साठवणीच्या काळात धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडीपासून साठवणीच्या धान्याचे संरक्षणार्थ उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते.

*असे होते धान्याचे किडीमुळे नुकसान -*
- वजनात घट होते.
- किडीमुळे धान्याचे तापमान व आर्द्रता वाढते. त्यामुळे धान्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. असे धान्य माणसाच्या खाण्यायोग्य राहत नाही.
- किडींची विष्ठा, जाळे तयार करण्याची सवय यामुळे धान्यांची प्रत खालवते.
- किडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याची चव बिघडते.
- धान्याची उगवण क्षमता कमी होऊन, बियाणे म्हणून वापर करता येत नाही.

*प्रादुर्भाव होण्याची प्रमुख कारणे -*

*धान्याचे तापमान -*
- धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात.
- धान्यातील ओलावा : धान्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १० टक्के पेक्षा जास्त असल्यास किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते.

*शेतातील प्रादुर्भाव -*
काही किटकांचे प्रौढ पिकांच्या पक्व अवस्थेतील दाण्यांवर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळाल्यानंतर अळी बाहेर येते. धान्य खाण्यास सुरवात करते.

*धान्य साठविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कोठ्या किंवा पोती -*
कोठ्या किंवा पोती ही दरवर्षी सातत्याने व्यवस्थित स्वच्छ केल्याशिवाय वापरल्यास त्यातील कीटक व त्यांची अंडी तशीच राहतात. ही पोती नवीन धान्याने भरल्यानंतर क्रियाशील होतात.

*साठवणीच्या ठिकाणी भेगा व छिद्रे -*
साठवणीची जागा, गोदाम रिकामे असतानाही तेथील भिंतीच्या भेंगा, फरशीची छिद्रे यामध्ये काही धान्य शिल्लक राहते. तेथील कीटक त्या धान्यावर नवीन धान्य येईपर्यंत उपजीविका करतात. तसेच भेगा व छिद्रांमध्ये हवामान पोषक होईपर्यंत सुप्तावस्थेत राहतात.

*वाहतुकीची साधने -*
मळणी झालेले धान्य ट्रक, ट्रॉली किंवा बैलगाडीतून साठवणीच्या ठिकाणी आणले जाते. या टप्प्यातही वाहनातील कानाकोपऱ्यात लपलेले कीटक धान्यात शिरू शकतात.

♦ *कीड नियंत्रण व्यवस्थापन* ♦

🔺 *१. प्रतिबंधात्मक उपाय* 🔺
*अ. स्वच्छता राखणे -*
- धान्य मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी. शक्यतो लोकवस्ती व धान्य साठवण्याच्या जागेपासून दूर असावी.
- कोठ्या सूर्यप्रकाशात ठेऊन स्वच्छ करून वापराव्यात.
- धान्य साठवणीच्या काळात धान्याचे पोते किंवा गोण्या जमिनीवर साठवू नये.

*ब. निर्जंतुकीकरण -*
- दरवर्षी साठवण जागेतील छिद्रे चुन्याने बुजवून घ्यावे.
- धान्य साठवणीची जागा व आजूबाजूचा परिसर झाडून, धुवून स्वछ करावा. सर्व काडीकचरा जाळून नष्ट करावा. सर्व छिद्र व बिळे काचेचा चुरा भरून नंतर सिमेंटने बंद करावीत.
- काढणी व मळणी यंत्राचा उपयोग करण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यावे.

🔺 *२. नियंत्रणात्मक उपाय* 🔺
*अ. अरासायनिक उपाय -*
- धान्य वाळवणे :
धान्य कडक उन्हात वाळवून, धान्याचे तापमान १० ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करावे.
- धान्यातील आर्द्रता :
धान्यातील आर्द्रता १० टक्के पेक्षा कमी असल्याची खात्री करूनच साठवण करावी.

*उधळणी किंवा चाळणी करणे -*
- साठवणीपूर्वी व साठवणीच्या काळात शक्य तितक्या वेळेस किडलेले खराब दाणे चाळणी व उधळणीद्वारे वेगळे करून घेतल्यास किडींचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
- धान्य साठवताना कडूलिंबाच्या पानांचा २ ते ३ ठिकाणी थर द्यावा.
- धान्याला १ चमचा प्रति किलो या प्रमाणात गोडतेल चोळावे.
- धान्यात राख मिसळल्यास, किडींच्या श्वसनामध्ये बाधा येऊन, किडी गुदमरून मरतात.

*ब. रासायनिक उपाय -*
गोदामातील रासायनिक उपायासाठी केंद्र सरकारकडून अधिकृत परवाना असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

📲 *अधिक माहितीकरिता संपर्क-*
*चंद्रकांत सावंत*,
९४२१३७८१०
*सचिन मुंढे*
९९६०१९६२५०
(पी.एचडी स्कॉलर, कृषी कीटकशात्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

29/08/2017

रेशीम शेड निर्जंतुकीकरण महत्त्वाचे…
रेशीम शेड निर्जंतुकीकरण महत्त्वाचे…

रेशीम शेती उद्योगातील यश हे शेडमधील निरोगी वातावरण, स्वच्छता, सकस तुतीचा पाला व योग्य व्यवस्थापन या चतुःसूत्रीवर अवलंबून आहे.

त्यापैकीच निर्जंतुकीकरण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

प्रति शंभर अंडीपुंजांपासून ८० ते १०० किलो कोषांचे उत्पादन होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शास्त्रीयदृष्ट्या निर्जंतुकी करणास अधिकाधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.

आज जागतिक पातळीवर कोषोत्पादनाचा विचार करता रेशीम शेती उद्योगात पुढारलेल्या चीन, जपान यांसारख्या देशांमध्ये रेशीम अळ्यांवरील रोग व किडींमुळे कोषोत्पादनात फक्त दोन टक्के नुकसान होते, तर भारतात तेच प्रमाण जवळपास २५ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे.

निर्जंतुकीकरण म्हणजे रेशीम अळ्यांना रोगजंतूंच्या संसर्गापासून दूर ठेवणे.

प्रत्येक शेतकऱ्याने रोगजंतूंचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे.

संपूर्ण वर्षभरात प्रत्येक कीटकसंगोपनानंतर निर्जंतुकीकरणाच्या वेळापत्रकाची आखणी करावी. त्याप्रमाणे नियोजन करावे.

प्रत्येक रेशीम उत्पादक शेतकऱ्यास रोगजंतूंचे कीटकसंगोपनगृहात येण्याचे मार्ग, रोगजंतूंचा विविध मार्गांनी होणारा प्रसार, रोगजंतूंना रोखण्याचे भौतिक व रासायनिक उपायांची माहिती असणे आवश्‍यक आहे.

बऱ्याचदा शेतकरी निर्जंतुकीकरणाचे शास्त्रीय महत्त्व माहीत नसल्याने अज्ञानापोटी निर्जंतुकीकरणास विशेष महत्त्व देत नाहीत.

परंतु यामुळे दर्जेदार कोषोत्पादनावर परिणाम होतो.

हे टाळण्यासाठी प्रत्येक रेशीम शेतकऱ्याने प्रभावी निर्जंतुकीकरण कार्यक्रम प्रत्येक कीटकसंगोपनाच्या वेळी राबविलाच पाहिजे.

अ) कीटकसंगोपनगृहात रोगप्रादुर्भाव होण्याचे विविध मार्ग :–

1) अंडीपुंज कागद अथवा अंडीपुंज पेटी.

2) कीटकसंगोपनगृह व परिसर.

3) कीटकसंगोपन साहित्य.

4) खत खड्डा.

5) कीटकसंगोपन हाताळणाऱ्या व्यक्ती, कीटकसंगोपनास भेटी देणाऱ्या व्यक्ती.

6) कीटकसंगोपनातील तांत्रिक त्रुटी.

7) तुती बाग.

8) कोष खरेदी केंद्रे.

9) स्वतःचे शास्त्रीय अज्ञान.

**नवीन तंत्रज्ञान अभ्यासा :–

रेशीम शेती उद्योगाबाबतीत इतर पिकांच्या तुलनेत विचार करता तितकासा अनुभव शेतकऱ्यांना नसतो.

तसेच कुटुंबातील सर्वच सदस्य रेशीम शेती उद्योगाबाबत अनभिज्ञ असल्याने कीटकसंगोपनाच्या वेळी त्यांची देखील मदत मिळत नाही.

नव्याने रेशीम शेती उद्योग करीत असलेल्या रेशीम शेतकऱ्यास कोषोत्पादन कमी होण्याची कारणे, रोगजंतूंचा प्रसार, त्याची कारणे, माध्यमे, रोगजंतू प्रसारास आळा घालण्याचे मार्ग, कोषोत्पादनासाठी निर्जंतुकीकरणाचे महत्त्व, निर्जंतुकीकरण म्हणजे काय, निर्जंतुकीकरणातील विविध पद्धती, रासायनिक निर्जंतुकीकरणातील रसायनाची माहिती, त्याचे प्रमाण, वापरण्याच्या पद्धती, अवस्थेनुसार मात्रा इत्यादींबाबत शास्त्रीय माहिती नसल्याने कीटकसंगोपनगृह व सभोवताल वातावरण निरोगी ठेवण्यास तसेच निर्जंतुकीकरणाची परिणामकारकता साधण्यास अडथळा येतो.

परिणामी कीटकसंगोपने यशस्वी होत नाहीत, अपेक्षित दर्जेदार व भरघोस कोषोत्पादन होत नाही.

हे लक्षात घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा.

**अंडीपुंज कागद अथवा अंडीपुंज पेटी :–

१) अंडीपुंज निर्मिती केंद्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास नव्याने तयार झालेल्या अंड्यांवर रोगाचा संसर्ग होण्याचा संभव असतो.

तसेच अंडीपुंज निर्मिती केंद्र ते शेतकरी कीटकसंगोपनगृह या दरम्यान अंडीपुंजांच्या वाहतुकीत वातावरणात असलेल्या रोगजंतूंचा अंड्यांना संसर्ग होण्याची शक्‍यता असते.

२) अंडीपुंज ज्या खोलीत ज्या चॉकी ट्रेमध्ये ठेवण्यात येणार आहे, त्याचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण केलेले नसल्यासदेखील अंडीपुंजांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्‍यता असते.

**कीटकसंगोपनगृह व परिसर :–

१) मागील कीटकसंगोपन पूर्ण झाल्यानंतर लगेच कीटकसंगोपनगृहाचे शास्त्रीय पद्धतीने निर्जंतुकीकरण न केल्याने रोगकारक घटक कीटकसंगोपनगृहातच राहतात.

पुढील कीटकसंगोपन चालू झाल्यानंतर सक्रिय होऊन रेशीम कीटकांना रोगाचा प्रादुर्भाव होतो.

२) कीटकसंगोपनगृह उघड्या गटाराजवळ, जनावरांच्या गोठ्यालगत, खत खड्ड्यालगत असल्यास रोगवाढीस सुयोग्य वातावरण मिळते.

यामुळेदेखील रोगजंतूंचा प्रसार होण्यास मदत मिळते.

**कीटक संगोपन साहित्य :–

१) बऱ्याचदा मागील संगोपन पूर्ण झाल्यानंतर संगोपन साहित्याच्या वेळीच निर्जंतुकीकरण न करता तेच साहित्य पुढील संगोपनाच्या वेळी वापरले जाते.
(उदा. चॉकी ट्रे, चंद्रिका वगैरे).

२) कधी कधी स्वतःकडील अपुऱ्या साहित्यामुळे शेजारील शेतकऱ्याकडील साहित्य वापरले जाते.

ते साहित्य जर निर्जंतुकीकरण केलेले नसेल तर अळ्यांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता निर्माण होते.

**खत खड्डा :–

१) बऱ्याचदा शेतकरी कीटकसंगोपनगृहाच्या लगतच खड्डा करतात.

या खड्ड्यात मागील कीटकसंगोपनाच्या वेळी अळ्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला, फांद्या, रोगीष्ट अळ्या, अळ्यांची विष्ठा, वापरलेले कागद, कीटकसंगोपनगृहातील इतर केरकचरा इत्यादी उघड्यावर टाकतात.

२) खताचा खड्डा कीटकसंगोपनगृहालगतच उघड्यावर असल्याने हवेच्या झुळकेने खत खड्ड्यातील बुरशीजन्य रोगांचे बिजाणू कीटकसंगोपनगृहात प्रवेश करून अळ्यांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्‍यता असते.

३) बऱ्याचदा कीटकसंगोपन संपल्यानंतर सदरचा केरकचरा, विष्ठा, वर्तमानपत्रे, तुती फांद्या खत खड्ड्यात न पुरता कीटकसंगोपनगृहाबाहेरच ढीग मारलेल्या अवस्थेत किंवा हवेने इकडे-तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असतो.

परिणामी रोगाचा कीटकसंगोपनगृहात प्रादुर्भाव लगेच दिसून येतो.

**कीटकसंगोपन हाताळणाऱ्या व्यक्ती, कीटकसंगोपनास भेटी देणाऱ्या व्यक्ती :–

१) बऱ्याचदा कीटकसंगोपन हाताळणाऱ्या व्यक्तीस निर्जंतुकीकरणाचे तसेच निरोगी वातावरणाचे शास्त्रीय महत्त्व माहिती नसते.

परिणामी कीटकसंगोपनगृहात प्रवेश करण्यापूर्वी पायातील चप्पल न काढणे, हात-पाय साबणाने किंवा फॉर्म्यालिनच्या द्रावणाने स्वच्छ न करताच कीटकांना खाद्य (तुती पाला) देणे,

कीटकसंगोपनगृहातच तंबाखू-गुटखा खाणे, विडी-सिगारेट ओढणे, स्वयंपाक करणे,

बी-बियाणे, खताची पोती, अवजारे, कीटकनाशके ठेवणे.

यामुळे रेशीम अळ्यांना रोगाचा संसर्ग होण्याची शक्‍यता असते.

२) आजही महाराष्ट्रात कीटकसंगोपनगृहात वेगळी स्लिपर चप्पल व ऍप्रॉनचा वापर प्रचलित नसल्याने अंगावरील कपड्यांद्वारे देखील रोगाच्या बिजाणूंचा प्रवेश कीटकसंगोपनगृहात होऊन रोग प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता निर्माण होते.

३) एकाच शेतकऱ्याकडे चॉकी व प्रौढ कीटकसंगोपन चालू असते.

हे दोन्ही संगोपन एकच व्यक्ती हाताळत असते, त्यामुळेदेखील चॉकी व प्रौढ कीटकसंगोपनास एकमेकांच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.

४) गावातील इतर शेतकऱ्यांकडे चालू असलेल्या कीटकसंगोपनात रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर अशा ठिकाणच्या व्यक्ती इतर ठिकाणच्या कीटकसंगोपनात कुतूहलापोटी भेटी देती असतील तर अशा व्यक्ती रोग बिजाणूंच्या प्रसाराचे माध्यम बनून रोगजंतूंचा प्रसार होतो.

त्याचप्रमाणे तालुक्‍यातील, जिल्ह्यातील, राज्यांतील शैक्षणिक सहलीदेखील रोगजंतू प्रसाराचे माध्यम बनून रोगजंतूंचा प्रसार होण्यास साह्यभूत ठरतात.

**कीटकसंगोपनातील तांत्रिक त्रुटी :–

कीटकसंगोपनगृहात एकाच वेळी वेगवेगळ्या अवस्थेतील कीटकसंगोपन चालू असणे,

पाला शिल्लक राहतो म्हणून वर्षभर एकामागून एक खंड न देता सलग कीटकसंगोपन घेणे,

कीटकसंगोपनगृहात आवश्‍यक तापमान व आर्द्रता न राखणे,

रेशीम अळ्यांना शिळा, पिवळा, रोगीष्ट, धूळयुक्त पाला खाऊ घालणे,

वेळच्या वेळी अनियमित वाढीच्या व रोगीष्ट अळ्या वेचून नष्ट न करणे,

ट्रे-रॅकमध्ये अळ्यांची प्रमाणापेक्षा दाटी असणे,

कीटकसंगोपनगृह स्वच्छ न ठेवणे,

अळ्यांना कातेवर (मोल्ट) बसविणे – उठविण्याची क्रिया योग्य रीतीने न होणे,

कीटकसंगोपनाच्या वेळी आवश्‍यकतेनुसार विरी गेलेला चुना – रेशीम किट औषधांचा वापर न करणे,

वेळोवेळी कीटकांची शय्या स्वच्छता न करणे
या सर्व बाबींमुळेदेखील अळ्यांना रोगाची बाधा होण्याची शक्‍यता असते.

**तुती बाग :–

१) बऱ्याच वेळा शेतकरी कीटकसंगोपन संपल्यानंतर कीटकसंगोपनगृहात शिल्लक राहिलेला पाला, अळ्यांची विष्ठा, रोगीष्ट अळ्या, वर्तमानपत्र कागद, काडीकचरा वगैरे खत खड्ड्यात न पुरता तुतीच्या बागेत खत होईल या उद्देशाने अथवा अज्ञानापोटी टाकतात.

परिणामी तुती बागेतील जमिनीवर, तुती झुडपांवर रोग पसरतो.

२) नवीन कीटकसंगोपनाच्या वेळी रेशीम अळ्यांना पाला तोडण्यासाठी शेतकरी तुती बागेत जातो त्या वेळी —

शेतकऱ्याचे पाय, चपला, अंगावरील कपड्यांना रोगाचा बिजाणू चिकटतात,
त्याचप्रमाणे तुती पाल्यावरदेखील रोगजंतू चिकटून कीटकसंगोपनगृहात प्रवेश करून अळ्यांना संसर्ग होतो.

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची पाळीव जनावरे अशा तुती बागेत गेल्यास जनावरांच्या अंगास, पायांना रोगाचे बिजाणू चिकटून रोगाचा प्रसार होतो.

**कोष खरेदी केंद्रे :–

कोष खरेदी केंद्रांवर पंचक्रोशीतून शेतकरी कोष विक्रीस आणतात.

या ठिकाणी चांगले, रोगट सर्वच प्रकारचे कोष येत असल्याने कोषांच्या बारदाण्याद्वारे देखील रोगाचा प्रसार होण्यास मदत होते.

25/08/2017

कापूस (कपाशी) पिकामधील पातेगळ

कपाशीच्या झाडास अनेक पाते लागतात परंतु त्यापैकी काही पात्यांचे फुले व बोंडांमध्ये रुपांतरण होते. सद्यस्थितीमध्ये कपाशी पिकामध्ये पातेगळीची समस्या भेडसावताना दिसत आहे. पाते-फुलांची गळ होणे ही एक झाडामधील स्वनियंत्रत बाब आहे.

*पातेगळ होण्याची कारणे*
- वाढीच्या प्रमाणात पात्यांची किंवा बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा होते. या काळात सुर्यप्रकाशाचा अभाव, एकदम वाढलेले तापमान, पावसाचा खंड (जमीनीत ओल नसणे), ढगाळ हवामान इत्यादी घटकांमुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकाचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे वहन होण्यास अडथळा येतो. गरजेच्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा न झाल्यामुळे पाते व बोंडांची गळ होते.
- वाढलेल्या तापमानामुळे किंवा उमलणारया फुलांवर पाऊस पडल्यामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही तसेच फुलांवरील किडी इत्यादी मुळे पाते फुलांची गळ होते. उशीरा लागवड झालेल्या पिकामध्ये गळ होण्याचे प्रमाण अधिक आढळते.
- कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाची दीर्घकाळ उघडीप असणे व त्याच्या जोडीला तापमानात झालेली वाढ यामुळे पातेगळ होते. महाराष्ट्रामध्ये लागवड जुन-जुलै महिन्यात होते. सुरुवातीच्या काळात पाते लागण्याच्या वेळी जुलै -ऑगस्ट महिन्यात ढगाळ हवामानामुळे पिकास सुर्यप्रकाश अपूरा मिळतो. त्याचप्रमाणे बोंडे लागण्याच्या काळात ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे ओल कमी होते. परिमाणी पाते-बोंड गळ होते.
- पिक वाढीकरिता पोषक नसलेल्या वातावरणामुळे, किडींच्या प्रादुर्भावांमुळे पिकामध्ये संप्रेरकांचे संतुलन बिघडते व नविन पाते पिवळसर होऊन गळतात.

*पातेगळ व्यवस्थापन*
-उत्तम निचरयाच्या जमिनीमध्येच कपाशी लागवड करावी.
- फुले लागण्याच्या अवस्थेत अधिक तापमान, ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशाप्रमाणे लागवड करावी.
- नैसर्गिक पातेगळ होत असल्यास एन.ए.ए. (प्लॅनोफिक्स) ४ मिली प्रती १० लीटर याप्रमाणे फवारणी करण्यात यावी.
- सिंचनाची सोय असल्यास कपाशी पिकाला सिंचन द्यावे किंवा संध्याकाळच्या वेळेला फक्त पाण्याची फवारणी करावी.
- पिक वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करावे. मुख्य अन्नद्रव्यांप्रमाणेच सूक्ष्मअन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. एकरी अर्धा किलो बोरॉनचा वापर सिंचनाद्वारे केल्यास पातेगळ कमी होते. सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता दिसत असल्यास एकरी २ लिटर मिक्स मायक्रोनुट्रिएंटचा वापर करावा.
- आटोपशीर ठेवण असणारया वाणांमध्ये गळ होण्याचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे अश्या जातींची लागवडीकरिता निवड करावी.
- किडींचा प्रादुर्भाव असल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार किड व्यवस्थापन करावे.
*- डॉ. विनायक शिंदे पाटील*, अहमदनगर, मुख्य प्रबंधक,कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

21/08/2017

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushishri-कृषिश्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share