31/05/2016
आजचा शेती सल्ला: झेंडू लागवड तंत्र
झेंडूची लागवड वर्षभरात तीनदा (खरीप, रब्बी व उन्हाळी) करता येत असल्याने वर्षभर फुलांचे उत्पादन मिळू शकते. लागवडीआधी जमीन एकसारखी सपाट व तणमुक्त, तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने तयार करावी. जमीन नांगरून भुसभुशीत करून त्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करावेत. तयार केलेल्या जमिनीस हलके पाणी द्यावे. खरीप हंगामात सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी, तर उन्हाळी व रब्बी हंगामात उंच सपाट वाफ्यांत लागवड करावी.
लागवडीनंतर ३०-४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. पूर्ण लागवड करताना शक्यतो दुपारनंतर करावी. रोपांची लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. पूर्ण लागवडीनंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.
रोपवाटिका तयार करताना -
गादीवाफा तयार करावा. या गादीवाफ्याची रुंदी ६०-७६ सें.मी. व उंची १५ ते २० सें.मी. असावी. गादीवाफ्याची लांबी, लागवडीच्या क्षेत्रानुसार व उपलब्ध जागेनुसार असावी. साधारणतः एक एकर लागवडीसाठी तीन मी. लांब व ६० सें.मी. रुंदीचे सहा-आठ गादीवाफे लागतात.
गादीवाफ्यासाठी जमीन भुसभुशीत करावी. त्यात १५ ते २० किलोग्रॅम चांगले कुजलेले शेणखत व २५ ग्रॅम डीएपी प्रति गादीवाफा टाकावे. गादीवाफ्यावर बियाणे टाकताना दोन ओळींत चार-पाच सें.मी. अंतर ठेवावे. बियाण्याची खोली दोन-तीन सें.मी. ठेवावी.
बियाणे पेरल्यानंतर गादीवाफ्यावर सुपीक माती व वाळू पसरावी. त्यानंतर गादीवाफा वाळलेल्या धानाच्या कडब्याने झाकून घ्यावा. बियाण्यांची उगवण होईपर्यंत गादीवाफ्यास झारीच्या साह्याने पाणी द्यावे. बियाणे पेरणीनंतर चार-पाच दिवसांनी उगवण दिसून येते.
झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, यांतील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू. हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून घेता येते. यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडू लागवड केली जाते.
हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून घेता येते. यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडू लागवड केली जाते.
आफ्रिकन झेंडू -
प्रमुख जाती - १) क्रॅकर जॅक, २) अलास्का, ३) ऑरेंज ट्रेझन्ट, ४) आफ्रिकन टॉल डबल मिक्स्ड
फ्रेंच झेंडू - महत्त्वाच्या जाती: १) स्प्रे, २) लेमन ड्रॉप्स, ३) फ्रेंच डबल मिक्स्ड
संकरित झेंडू -
जाती - १) पिटाईट, २) जिप्सी, ३) रेड हेड, ४) इन्का ऑरेंज, ५) इन्का यलो.
आंतरमशागत
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावा. लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्या वाराम्ब्यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे. त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते. खते आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश याप्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीन.
पीक संरक्षण (रोपवाटिका) सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याने कार्बनडेझीम २० ग्रॅम किंवा कॅपटॉप २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात. पाणी हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
झेंडू या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी योग्य ते किटक्नाषक / बुरशीनाशक फवारावे. फवारणी करतांना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.
"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.