11/01/2020
*‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंड क्षेत्राची वाटचाल”.*
*भारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची* (Indian Mutual Fund Industry) सुरुवात १९६३ मध्ये ‘यूटीआय’च्या (UTI) स्थापनेपासून झाली. त्यात भारत सरकार व आरबीआयने (RBI) पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंडची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते.
१९६३ ते १९८७ ह्या काळात फक्त यूटीआय ही म्युच्युअल फंड बाजारात होती. युनिट ६४ ही योजना चांगलीच नावाजलेली होती. १९८७ च्या शेवटी साधारण रु.६,७०० करोडची मालमत्ता यूटीआय सांभाळत होती.
त्यानंतरचा भाग हा १९८८ ते १९९३ चा काळ, ह्या काळात एसबीआय, एलआयसी व इतर पब्लिक सेक्टर संस्थांनी आपले म्युच्युअल फंड चालू केले. १९९३ मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची मालमत्ता साधारण रु.४७,००० करोड होती.
तिसरा भाग १९९३ तो २००३ चा काळ, ह्या काळात प्रायव्हेट सेक्टर म्युच्युअल फंडांनी आपले फंड चालू केले. त्या काळात लोकांमध्ये असलेल्या आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची वाढ धीम्या गतीनेच होत होती. २००३ मध्ये म्युच्युअल फंडाची मालमत्ता साधारण रु.१,२२,००० करोड होती.
चौथा महत्वाचा भाग म्हणजे २००३ साला नंतरचा भाग. २००३ साली यूटीआयची दोन भागात विभागणी झाली, ज्या जुन्या योजना होत्या त्या एका भाग मध्ये प्रशासक नेमून बाजूला केल्या गेल्या आणि बाकीच्या योजना इतर म्युच्युअल फंडाप्रमाणे सेबी च्या नियंत्रणाखाली आणल्या. बरेच विदेशी म्युच्युअल फंड सुद्धा भारतात आले. त्यापैकी काहींनी आपला व्यवसाय वाढवला, तर काही विदेशी कंपन्या आपला म्युच्युअल फंड इतर म्युच्युअल फंडाकडे सोपवून निघून गेले.
म्युच्युअल फंडचा व्यवसाय जो २०१० साली साधारण रु.७,५०,००० करोड होता, तो आता वाढून नोव्हेंबर २०१९ साली रु.२७,००,००० लाख करोड पार झाला आहे.
म्युच्युअल फंडाची जी असोशिएशन आहे ज्याला अँफी (AMFI) म्हणतात, त्यांनी सर्व म्युच्युअल फंडांसाठी वेळोवेळी सर्वोत्तम कार्य मार्गदर्शक तत्त्वे (Best Practices Guidelines) आणून म्युच्युअल फंडचा कारभार गुंतवणूकदारांसाठी सुखकर केला. तसेच, सर्व म्युच्युअल फंडाच्या मदतीने जास्तीत जास्त गुंतवणूक मागदर्शन मेळावे भरवून आर्थिक साक्षारतेसाठी खूप काम केले. त्याचा परिणाम हा आज म्युच्युअल फंड सर्व पसंतीचा गुंतवणूक पर्याय झालेला आहे.
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
म्युच्युअल फंड सही है l
धन्यवाद!