04/02/2020
सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन !
कोंढाणा युद्धाची ३५० वर्षपुर्ती,गड आला पण सिंह गेला नरवीर तानाजी मालुसरे यांनी गड वाचवण्यासाठी बलिदान दिले पण आज महाराष्ट्रात शासन गड किल्ले वाचवण्यासाठी कमी पडते!
नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कोंढाणा किल्ला सर केला. स्वत:च्या अतूलनिय शौर्याने स्वराज्याचा रणसंग्राम अजरामर केला. आज मंगळवार, ४ फेब्रुवारी, कोंढाणा म्हणजेच आजच्या सिंहगडावरील रणसंग्रामाला व सातारा जिल्ह्यातील भुमिपुत्र तान्हाजी मालुसरे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पुर्ण होत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा किल्ल्याची मोहिम बालसवंगडी तान्हाजीवर सोपवली. स्वत:च्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत नरवीर तान्हाजी मालुसरे सैन्यानिशी गुंजवणी नदी पार करत कोंढाणाच्या (सिंहगड) पायथ्याला येऊन पोचले. आजच्या दिवशी, ४ फेब्रुवारी १६७० रोजी मुठभर मावळ्यांनीशी अभेद्य असा कोंढाणा किल्ला अत्यंत अवघड अशा द्रोणगिरी कड्याच्या बाजुने अंधा-या रात्री चढले.
उदयभान राठोड व त्याच्या सुमारे १५०० हशमांच्या फौजेला अवघ्या ५०० मराठ्यांनी अतूलनीय पराक्रम गाजवून धूळ चारली. शत्रूशी बेभान होऊन लढताना या रणसंग्रामात हातातील ढाल पडल्यानंतरही शेला गुंडाळून लढणा-या नरवीरांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले.
उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी तान्हाजींचे बलिदान सार्थकी ठरवत किल्ला काबीज केला. गवताच्या गंज्या पेटवून राजांना राजगडावरती कोंढाणा स्वराज्यात आणल्याचा संदेश दिला गेला होता.
मराठी साहित्यविश्वात 'आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे' व 'गड आला पण सिंह गेला' हे दोन वाक्यप्रचार नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या अलौकीक कामगिरीमुळे अजरामर झाले. मालुसरे यांचे गाव असलेल्या गोडवलीचे ग्रामस्थ आज साडेतीनशे वर्षांनंतरही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृती हृदयात जपून आहेत.