24/03/2022
भारतात गुंतवणुकीचा विचार करणारी प्रत्येक व्यक्ती, ही गुंतवणूक करताना जास्त रकमेची गरज असते, या एका कारणामुळे गुंतवणुकीपासून दूर राहते. आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून आपण कमीत कमी रकमेपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. आपल्या मराठीत फार छान म्हण आहे “थेंबे थेंबे तळे साचे” त्याच धर्तीवर आपण छोट्या छोटी गुंतवणूक करून भली मोठी रक्कम उभी करू शकतो. आणि जिथे आपण SIPच्या माध्यमातून अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो, तिथे एकरकमी गुंतवणुकीचा विचार करत चिंतेत का पडायचे ???
SIP म्हणजे systematic Investment Plan.
ठराविक वेळेनंतर ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP).
ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची एक सामान्यांना परवडणारी पद्धत आहे. ज्यामध्ये आपण निवडलेल्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये एक ठरावीक रक्कम ठरावीक अंतराने गुंतवू शकता. ही रक्कम कुठल्याही शेअरच्या किमतीवर आधारित राहत नाहीत. उलट जेव्हा शेअरच्या किमती पडतात, तेव्हा तुम्हाला जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधीही मिळते.
SIP कशाप्रकारे काम करते ?
ज्याप्रमाणे आपण रोज थोडा थोडा अभ्यास करून परीक्षेची तयारी करू शकतो. जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व तयारी करायची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे ही एसआयपी काम करते. आर्थिक शिस्त व नियमित गुंतवणूकीची सवय लागण्यासाठी ‘एसआयपी’ हा एक पर्याय आहे. एसआयपी सुरू केल्यानंतर आपल्या खात्यातून दर महिन्याला एक आपण ठरवल्याप्रमाणे एक निश्चित रक्कम डेबिट करण्यात येते.
जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे एक छोटी रक्कम गुंतवता. तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला एक निश्चित रक्कम वजा केली जाते. SIP सहसा तुम्हाला नियमितपणे गुंतवणूक करण्याची परवानगी देतात, मग ती साप्ताहिक, त्रैमासिक किंवा मासिक असो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही SIP दर महिन्याच्या 10 तारखेला शेड्यूल केली असेल, तर त्या तारखेला एक निश्चित रक्कम डेबिट केली जाईल आणि दर महिन्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाईल.
SIP चे काही फायदे
नवीन गुंतवणूकदारांसाठी अनुकूल
सुरवातीला आपल्याकडे ज्ञान नसते. कोणत्या कंपनीत गुंतवणूक करायला हवी? ती कंपनी कशी निवडायची याची माहिती नसतानाही आपण SIP च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो. स्वतः मार्केटचा जास्त अभ्यास करावा लागत नाही. स्वतः शेअर निवडावे लागत नाहीत.
खूप कमी पैशांची गरज
SIP मध्ये गुंतवणूक करताना आपल्याकडे काही लाख रुपये असण्याची गरज नाही. आपण अगदी 500 रुपयापासून सुरुवात करू शकतो. काही स्कीममध्ये तर 1000 रुपयांपासून ही गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.
Rupee Cost Averaging चा फायदा
मार्केटमध्ये चढ-उतार येत असतात पण आपली गुंतवणूकीची रक्कम ही सारखीच असते. अशावेळी जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा आपल्याला त्याच किमतीत जास्त शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाचे अधिक युनिट्स मिळतात. यामुळे तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सची किंवा युनिटची सरासरी किंमत कमी होते आणि दीर्घकाळात आपल्याला याचा चांगला फायदा होतो.
Rupee Cost Averaging
( जेव्हा आपण म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला म्युच्युअल फंड युनिट्स मिळतात. आपण ज्या प्रमाणे शेअर्स खरेदी केले की, ते आपल्या खात्यात जमा होतात. त्याचप्रमाणे एसआयपी केल्यावर हे युनिट आपल्याला मिळतात. आणि आपल्याला किती युनिट मिळतील हे त्या म्युचल फंड स्कीमच्या NAV (Net Asset Value) वर अवलंबून असते. )
चक्रवाढीचा फायदा
चक्रवाढ व्याज तुम्हाला माहीतच आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणूकीच्या परताव्यावर (Returns) चक्रवाढव्याज पद्धतीने आणखी परतावा मिळतो.
जर तुम्ही म्युच्युअल फंडात 1,000 रुपये गुंतवले आणि त्यावर तुम्हाला 10% म्हणजेच 100 परतावा मिळाला. आता ही रक्कम तुमच्या मूळ भांडवलात जोडली जाईल आणि पुढल्या वेळी तुम्हाला 1,100 या रकमेवर 10% म्हणजेच 110 परतावा मिळेल. हे असेच वाढत जाईल.
जास्त टेन्शन नाही
बहुतेक एसआयपी स्कीममध्ये रक्कम ही आपल्या खात्यातून Automatically डेबिट होत असते. दर महिन्याला आपल्याला स्वतः कष्ट करून पैसे भरण्याची गरज नसते. फक्त ज्या अकाउंट मधून एसआयपीचे पैसे भरले जाणार आहेत, त्यात पुरेशी रक्कम असणे गरजेचे असते.
काही महत्त्वाचे सल्ले :-
एसआयपी मार्फत म्युचल फंडात गुंतवणूक करत असाल, तर योग्य म्युचल फंड निवडा. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात आणि प्रत्येकाचे नियम वेगळे असतात.
सुरुवातीच्या काळात मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका. कमी रक्कमेपासून सुरुवात करा आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक वाढवा.
एसआयपीमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, म्हणून लांबपल्ल्याचा (Long Term) दृष्टिकोन ठेवा.
शेअर बाजार एका सरळ रेषेत वर जात नाही. म्हणून बाजारात मंदी आली की, एसआयपीमधील गुंतवणूक अचानक थांबवू नका.
म्यूचुअल फंडमध्ये SIP चा पर्याय निवडून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. दर महिन्याला ठरलेल्या तारखेला तुम्ही निवडलेली रक्कम तुमच्या बँकेतून वजा होईल आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली जाईल.
PAG Investment, Prasanna Ghodke
(MUTUAL FUND, INSURANCE & STOCK MARKET)
Mr. Prasanna Anil Ghodke
(ARN-193729)
Mobile No. : 9028655545
Mail ID : [email protected]
(AMFI Register Mutual fund Distributor)