07/08/2024
*कृतज्ञता सोहळा सैनिक हो तुमच्यासाठी*...
*जय हिंद जनजागृती प्रतिष्ठान तर्फे कारगिल युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कार*
कारगिल युद्धामध्ये हिंदुस्तानी जवानांनी जे अतुलनीय शौर्य दाखवले होते त्या शौर्यासाठी २६ जुलै हा दिवस आपल्या देशात विजय दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे हे रोप्य महोत्सवी विजयी दिनाचे औचित्य साधून जय हिंद जनजागृती प्रतिष्ठान तर्फे शुक्रवारी (२६ जुलै) संध्याकाळी ४:०० वाजता शौर्य वंदन यात्रा, मृदा कलश पूजन, शिष्यवृत्ती वितरण समारंभ आणि शौर्य गौरव पुरस्काराचे वितरण बोरिवली येथील स्वामीनारायण सभागृहात करण्यात आले.
जय हिंद जनजागृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, लायन्स क्लब ऑफ सफाळे चे अध्यक्ष प्रमोद पाटील, नायक विजय कातोरे, वीर माता ज्योती राणे, यांच्यासह कारगिल योद्धे कर्नल चंद्रशेखर उन्नी, कॅप्टन प्रदीप पटनायक, कीर्ती चक्र प्राप्त सुभेदार संतोष राळे, शौर्य चक्र प्राप्त पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे, जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयवंत राऊत; माननीय रामेश्वर डागा माननीय प्रशांत पुजारी उपस्थित होते.
शौर्य वंदन शोभा यात्रेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वामीनारायण मंदिर येथे कारगिल युद्धातील शहिदांच्या पवित्र भूमीतून आणलेल्या मृदा कलशाचे मान्यवरांकडून पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय वासुदेव नथुराम राऊत यांच्या स्मरणार्थ दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या कार्याध्यक्षा भाग्यश्री राऊत यांनी संस्थेचा कार्य वृत्तांत सादर केला आपल्या मार्गदर्शन पर भाषणात कॅप्टन प्रदीप पटनायक यांनी या युद्धातला त्यांचा प्रत्यक्ष अनुभव कथन केला कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून प्रत्येक शहिदाच्या भूमितील मृदा कलशाचे संकलन करणारे माजी सैनिक नायक विजय कातोरे यांनी त्यांच्या 4000 किलोमीटरच्या शौर्यवंदन यात्रेत आलेल्या अनुभवाचे वर्णन केले.
याप्रसंगी शायरी पाटील हिने उत्कृष्ट नृत्य करून तर आद्या राऊत व सुप्रसिद्ध गायिका ब्रह्मनंदा पाटणकर यांनी मधुर आवाजामध्ये देशभक्तीपर गाणी गाऊन सर्वांची मने जिंकली.